माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. आरोपींनी पैशाच्या वादातून पत्नीला मारहाण करत पतीचे अपहरण केले.
आर्थिक व्यवहारातून तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून पती-पत्नीला काठीने मारहाण केली, तसेच त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे हातपाय बांधून जबरदस्तीने अपहरण केले. ही घटना गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे एका हॉटेलसमोर घडली.
काजल दत्ता माने (रा.महूद, ढाळेवाडी, ता. सांगोला) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संग्राम महादेव गिड्डे, राजेश गिड्डे व शबप्पा गिड्डे (तिघेही रा.सापटणे, ता. माढा) यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
काजल माने यांचे पती दत्ता संजय माने याने ऊस तोडणी मशिनवर कामाला ऑपरेटर देतो, म्हणून संग्राम गिड्डे, राजेश गिड्डे व बप्पा गिड्डे (तिघेही रा.सापटणे ता. माढा) यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे परत करण्याच्या व्यवहारातून दत्ता माने यास ते तिघेजण घेऊन जात असताना तिने त्यांना तुम्ही पतीला कोठे घेऊन चालला आहात, अशी विचारणा केली.
त्यावेळी बप्पा गिड्डे यांनी काजल माने यांच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पती दत्ता यास शिवीगाळ केली. इतकंच नाही तर दमदाटी करून बप्पा गिट्टे यांनी हाताने व काठीने काजल माने यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली. तिघांनी पती-पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे दोरीने हातपाय बांधून त्याचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.