Posts

चंदननगरच्या शाळेत वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

 मोहोळ: मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंदननगर (लांबोटी) येथे ४०० केव्ही ग्रहण केंद्र विभाग, महापारेषण विद्युत कंपनी, लांबोटी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.

महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता जयभाय यांनी यावेळी बोलताना, पावसाळ्याच्या दिवसांत लावलेली झाडे जगण्याची शक्यता जास्त असते, असे सांगितले. तसेच, लहान वयातच मुलांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे आणि सर्वांनी लावलेल्या वृक्षांची जोपासना करावी, असे आवाहन केले. शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण होनमाने यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक हमीदखाँ पठाण यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना लावलेल्या सर्व वृक्षांना वाढवण्याविषयी प्रोत्साहित केले. तसेच, विद्यार्थ्यांना घरी लावण्यासाठी आंबा, चिंच, बदाम, आवळा, कदंब आणि गुलमोहर अशा विविध वृक्षांचे महापारेषण कंपनीकडून वाटप करण्यात आले.

Post a Comment